जालना, दि. २५ मार्च २०२६ — जालना जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या पुरवठ्यात गंभीर तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संध्याकाळपासून जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंप बंद झाल्याची माहिती समोर येत असून, वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.

गेल्या काही तासांपासून “इंधन संपले” या अफवांनी जोर धरला होता. मात्र प्रत्यक्षात पंप बंद झाल्याने या अफवांना अधिकच खतपाणी मिळाले. पेट्रोल व डिझेल मिळत नसल्याने अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी नागरिक आणि पंप व्यवस्थापन यांच्यात वादाचे प्रसंगही घडल्याचे समजते.

घरगुती गॅसचा पुरवठाही विस्कळीत झाल्याने महिलांमध्ये विशेष नाराजी व्यक्त होत आहे. “दररोजच्या जीवनावश्यक गोष्टींसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असेल, तर प्रशासन नेमके काय करत आहे?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

जिल्हा प्रशासनाकडून या परिस्थितीवर कोणतीही ठोस आणि स्पष्ट भूमिका समोर न आल्याने नागरिकांमध्ये अधिकच नाराजी वाढत आहे. “पुरवठा सुरळीत आहे” असे सांगणारे प्रशासन प्रत्यक्ष परिस्थितीत मात्र पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप होत आहे.

दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास मोठा जनप्रक्षोभ उसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाकडून तात्काळ हस्तक्षेप करून इंधन आणि गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed