नुसते बाहेर फेर फटका जरी मारायला निघाले तर चहाच्या टपऱ्या, कांदाभजी, पोहे, समोस्याच्या गाड्या, प्रतिष्ठित मिष्ठान्नाची थाटलेली दुकाने बघा किंवा थाटामाटाच्या अॅम्बियन्स साठी खिसे रिकामे करणारे हॉटेल्स बघा, नाही तर मध्यमवर्गीय लोकांना परवडणारे रेस्टॉरंट्स वर नजर टाका या ठिकाणांवर सतत रेलचेल लागलेली असते. इतकंच काय तर प्रत्येक गृहिणीला अविरत पिढ्यान् पिढ्या पडत आलेला ज्वलंत प्रश्न एकच “आज स्वयंपाक काय करायचा??” आणि या अनादि काळाच्या समस्येला सोडवण्याची जबाबदारी असंख्य कुकरी बुक्स, शो, यू ट्यूब चॅनेल्स च्या माध्यमाने कित्येक शेफस् आणि सुग्रणी पार पाडत आहेत.

दोन वेळेच्या जेवणाच्या भरवशावर ‘अन्न हे पूर्ण परब्रम्ह’ चा थाट मिरवत फूड इंडस्ट्रीची चंगळ चाललीये खरी, पण या फास्टफूड आणि जंकफूडचा धाक निर्माण करून ऑर्गेनिक फूडवाल्यांचे पण चांगलेच फावले आहे.

मल्टीविटॅमिन फूड ऍडव्हारटायझिंग मुळे टीव्ही आणि इतर मध्यमांनी 2 मिनिट नूडल्स, पिझ्झा, बर्गर, कोक चा ट्रेंड चालवला आहे. त्यामुळे घरातली मुले ही हेच सगळे खाण्याचा हट्ट करतात, मग यांच्या पोषकतत्वांच्या पूर्तते साठी टॅबलेट्स, च्युएबल्स, प्रोटीन पावडर इत्यादि सप्लिमेन्टच्या कुबड्या तयार आहेतच की! हा तर माणसाचा स्वभावच आहे, सोप्या गोष्टींना आधी गुंतवायचे आणि मग तो गुंता सोडवण्यात संपूर्ण आयुष्य घालवायचे. आदिमानव गेला असेल का मल्टीविटॅमिन च्या शोधात कुठे? त्याने आपल्या गरजा भागवण्यासाठी नैसर्गिक तत्वांचा आधार घेतला. माणसाच्या बहुतेक समस्यांची उत्पत्ति ही त्याच्या मेंदू पासूनच होते. ती मुकी जनावरे कित्येक पिढ्या तोच हिरवा चारा खाऊन आनंदानी जगत आहेत. त्यांची अन्नसाखळी आहे तशीच सुरू आहे, आणि तरीही त्यांचे या भूतलावरचे अस्तित्व टिकून आहे बरका! पण माणसाचे छंदच वेगळे… त्यांना आपला वेगळेपणा दाखवण्यात भारी मज्जा येते, आणि या सगळ्याचा भार पडतो एका आईच्या खांद्यावर.! आपल्या कुटुंबाला या सर्व धुमकुळापासून दूर ठेऊन संतुलित आहार कसा पुढ्यात ठेवायचा हे एक आव्हान प्रत्येक गृहिणीला शिवधनुष्या सारखे पेलावे लागते.

आपल्या योगसुत्रांत दिलेली पथ्ये, उपवास तसेच संतुलित आहाराची गरज वैगरे आपण आपल्या सोयीनुसार वापरत असतो. “जगण्यासाठी खाणे” आताच्या इंडस्ट्रियल ट्रेंडस् च्या प्रचार आणि प्रसारामुळे बदलून “खाण्यासाठी जगण्या” इतपत फोफावत चालले आहे. अर्थात आहार विषयक मत ही अतिशय वैयक्तिक बाब आहे कारण कुठल्या गोष्टीला किती महत्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. वाटले म्हणून लिहिले..

3 thoughts on “खाण्यासाठी जन्म आपुला ?”
  1. जय सोमनाथ।

    एकदम मस्त खाना बनाती हे आप और आपके हाथ का खाने का स्वाद भी बहुत मस्त होता हे।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed