जालना (दि. २) : जालना महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या आयुक्त पदावर अखेर राज्य शासनाने नियुक्ती केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी श्रीमती अंजली शर्मा यांची जालना महानगरपालिकेच्या नवीन आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी गुरुवारी (२ एप्रिल) यासंदर्भातील अधिकृत आदेश निर्गमित केले आहेत. अंजली शर्मा या २०२१ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून, यापूर्वी त्या नंदुरबार येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.

तातडीने पदभार स्वीकारण्याचे आदेश
जालना महानगरपालिकेचे आयुक्त पद रिक्त असल्याने जिल्हाधिकारी श्रीम. अशिमा मित्तल यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. शासनाच्या नवीन आदेशानुसार, नवनियुक्त आयुक्त अंजली शर्मा यांनी जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांच्याकडून आपल्या पदाचा कार्यभार तातडीने स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महानगरपालिकेच्या कामकाजाला मिळणार गती
जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नवीन आयुक्तांच्या नियुक्तीमुळे शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांना ‘सुप्रीमों’ (Supremo) प्रणालीवर आपला अहवाल अपडेट करण्याच्या सूचनाही सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत.

या नियुक्तीमुळे प्रशासकीय वर्तुळातून समाधान व्यक्त होत असून, एका तरुण आणि अनुभवी अधिकाऱ्याकडे जालन्याची धुरा सोपवण्यात आली आहे असे मत व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed