यत् पिंडे तत् ब्रम्हांडे | यत् ब्रम्हांडे तत् पिंडे
अर्थात जे पंचतत्व या ब्रम्हांडाच्या निर्मितीस कारणीभूत आहेत त्याच पंचतत्वांनी हा मानवी देह घडला आहे. या पार्श्वभूमी वर ब्रम्हांडात सक्रिय पंचतत्वांचा परिणाम या मानवी आयुष्यावर होणे क्रमप्राप्त आहे. थोडक्यात म्हणायचे झालेच तर जी विस्तृत सृष्टि आपण आपल्या डोळ्यांनी बाहेर बघत आहोत ती सर्वस्वी आपल्या आत खोलवर रुजलेली आहे. ब्रम्हांड दर्शन करण्यासाठी मायक्रोस्कोप उपलब्ध आहेत, पण या देहातली सृष्टि जाणून घेण्यासाठी मात्र वैदिक ज्योतिष्य शास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे.
‘ब्रम्हांडाला ना आदि ना अंत’ तसाच हा विषय आहे. आपल्या दृष्टिक्षेपाच्या मर्यादेनुसारच ब्रम्हांडाचे आकाशगंगा स्थित स्थिर पोकळीयुक्त अवकाश (galactic disc) या स्वरूपात अध्ययन केले जाते. हे अवकाश बारा राशींमध्ये विभाजित होते यालाच राशिचक्र असे म्हणतात.
राशिचक्राची प्रथम रास मेष राशि आहे. प्रथम क्रमांकाची राशि असल्याने कालपुरुषाच्या मस्तकाचे प्रतिनिधित्व ही राशि करते. या राशिचे स्वामित्व मंगळ ग्रहाच्या अधीन आहे. मंगळ ग्रह हा देवांचा सेनापति ग्रह आहे, त्याप्रमाणेच मेष राशि ही पराक्रमी, साहसी, ऊर्जावान, क्रोधी तसेच क्रूर राशि आहे. ही तारुण्यावस्थेला अनुकूल अशी राशि आहे. ही अग्नितत्व राशि असून जठराग्नि चे प्रतिनिधित्व करते. सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास या राशिच्या लोकांच्या अंगी बाणलेला असतो. ‘ये दिल मांगे मोअर’ अशी त्यांची अभिव्यक्ति असते. अस्थिर मनोवृत्ति, सहनशीलतेचा अभाव असलेली ही माणसे सतत व्यस्त असलेली जाणवतात. ही माणसे स्वतंत्र विचारशैलीची, वरून उग्र, आवेशात्मक वाटणारी पण प्रसंगी अतिसंवेदनशील असतात. आप्तेष्ट आणि स्वजनांसाठी अतिसंरक्षणात्मक तोरा मिरवत असतात. यांच्या ठायी एक उत्तम नेतृत्वकर्ता, क्रांतिकारी व्यक्तित्व तसेच महत्वाकांक्षी वृत्ती बघण्यास मिळते.
‘सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा!’ अश्या उच्छृंखल, निर्भीक वृत्तीचे दर्शन मेष राशि घडवते. हे व्यक्ति परिवर्तनशील, अविचारी, बेजवाबदार परंतु व्यवसाया प्रति समर्पित असतात. रूक्ष स्वभावाचे, वर्चस्व गाजवणारे, रूढ़िवादी, धोरणात्मक, व्यवहारचतुर, लढ़ाऊवृत्तीची ही माणसे कुशलवक्ता असतात. धोरणात्मक अभिव्यक्तिमुळे यांच्यासाठी सत्य – असत्य एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. यांना प्रवासाची आवड असते. अग्नितत्व प्रबल असलेल्या या माणसांच्या मनात पाण्याविषयी मात्र एक अजाण भीती असते. यांना स्वकष्टाने स्वतःचे जीवन घड़वावे लागते. यांचे आयुष्य आर्थिक उतार चढ़ावाने परिपूर्ण असते. ज्येष्ठ तसेच श्रेष्ठ अधिकार्यांतर्फे असहयोगाच्या परिस्थितिचा सामना यांना करावा लागतो. यांचे जीवन संघर्षमय असून कुठल्याही परिस्थितिवर मात करण्याचे सामर्थ्य यांच्या ठायी रुजलेले असते. आव्हानात्मक परिस्थिति यांच्यातील अदम्य साहस-शक्तिला अधिकाधिक गौरवान्वित करते. मेष राशिची माणसे पोलिस खाते, मिल्ट्री – डिफेंस सर्विस, इंजीनियरिंग, वैद्यकीय शस्त्रक्रिया, स्वतंत्र व्यवसाय उद्योजक, एथलीट – व्यावसायिक खेडाळू, रियल इस्टेट एजंट इत्यादि क्षेत्रात उत्तम कामगिरी पार पाडू शकतात.

One thought on “‘सोचना क्या जो भी होगा देखा जाएगा!’ – मेष राशि आविर्भाव”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed