शेअर बाजारातील गुंतवणुकीचे आमिष; दोन वेगवेगळ्या प्रकरणांत गुन्हे दाखल

नागपूर : शेअर बाजारात अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर ठगांनी नागपुरातील दोन नागरिकांची एकूण 65 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

पहिले प्रकरण मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. 47 वर्षीय अधिवक्त्याला जानेवारी महिन्यात ‘22 VIP सर्व्हिसेस ग्रुप’ नावाच्या व्हॉट्सॲप गटात जोडण्यात आले. या गटामध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीवर 10 ते 15 टक्के नफ्याचे आश्वासन देण्यात आले. विश्वास संपादन करण्यासाठी बनावट कागदपत्रे आणि संदेश पाठवण्यात आले. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात आले. या आमिषाला बळी पडून संबंधित अधिवक्त्याने 49 लाख 59 हजार रुपये ठगांच्या खात्यात ट्रान्सफर केले. अपेक्षित नफा न मिळाल्याने व संपर्क तुटल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

दुसरे प्रकरण सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे. 45 वर्षीय आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्याला व्हॉट्सॲप कॉल आणि संदेशांद्वारे संपर्क साधत एका नामांकित गुंतवणूक कंपनीशी संबंधित असल्याचे भासवण्यात आले. बनावट लिंकद्वारे खोटे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म दाखवून विश्वास संपादन करण्यात आला. या प्रकरणात तक्रारदाराकडून 15 लाख 39 हजार 107 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

दोन्ही प्रकरणांत सायबर पोलिसांकडून संबंधित मोबाईल क्रमांक, बँक खाती व आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही ऑनलाइन गुंतवणुकीपूर्वी लिंक, गट किंवा कंपनीची खात्री करूनच व्यवहार करावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed